मेट्रो ६ मार्गिकेतील अडथळा दूर ;जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यांवरील बांधकामांवर हातोडा

मेट्रो ६ मार्गिकेतील अडथळा दूर ;जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यांवरील बांधकामांवर हातोडा

कारवाईसाठी ५० पोलिसांची मदत घेण्यात आली. तर महानगरपालिकेचे २५ कामगार, २ जेसीबी, १ पोकलेनचा वापर करण्यात आला.
Published on

मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता येथे मेट्रो-६ च्या बांधकामात आणि रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ४५ बांधकामांवर सोमवारी हातोडा चालवण्यात आला. यामुळे मेट्रो-६ च्या कामाला गती मिळणार असून रस्ता रुंदीकरणासह वाहतूककोंडी फुटणार आहे. तसेच एसव्ही मार्ग ते लोखंडवाला व काही भागात पूर्व व पश्चिम प्रवासासाठी या कामामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेक प्राधिकरणांसह न्यायालयीन प्रकरणांमुळे येथील निष्कासन लांबणीवर पडले होते. मेट्रो मार्ग सहाच्या प्रकल्पाचे काम प्रलंबित होते. तसेच बांधकाम आणि रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने परिसरात मोठी वाहतूककोंडी होत होती. पर्जन्य जलवाहिन्यांच्या मिसिंग लिंकमुळे या ठिकाणी झाल्यामुळे ड्रेनेजची मोठी समस्याही भेडसावत होती. या निष्कासन कारवाईमुळे आता परिसरातील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पांतर्गत पर्जन्य जलवाहिन्या आणि रस्त्याचे काम हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. इन्फिनिटी मॉल ते वीरा देसाई हा ३६.६० मीटर रुंदीचा विकासरस्ता रुंदीकरणासाठी घेण्यात आला आहे. एकदा हा मार्ग पूर्ण झाल्यावर एसव्ही मार्ग ते लोखंडवाला आणि जवळपासच्या भागात पूर्व पश्चिम प्रवासासाठी मोठा दिलासा मिळेल.

एमएमआरडीएमार्फत मेट्रो-६ मार्गिकेचा प्रकल्प हा जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्त्याला समांतर पद्धतीने (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीदरम्यान) १४.१० किलोमीटर लांबीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. लिंक रोड ते एसव्ही मार्गादरम्यान १२० फुटाचा १ किलोमीटरचा रस्ता एमएमआरडीएमार्फत विकसित करण्यात येत आहे.

अशी झाली कारवाई!

जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरील रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो मार्गिका सहाच्या कामात अडथळा ठरणारी बेकायदा बांधकामे पालिकेच्या के. पश्चिम विभागामार्फत जमीनदोस्त करण्यात आली. ओशिवरा पोलिसांच्या मदतीने एकूण ४५ बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी ५० पोलिसांची मदत घेण्यात आली. तर महानगरपालिकेचे २५ कामगार, २ जेसीबी, १ पोकलेनचा वापर करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in