मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार -फडणवीस

रस्त्यावर उतरून अथवा न्यायालयीन लढाईसाठी देखील आपण तयार आहोत. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा
मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार -फडणवीस
ANI

जो राग आहे माझ्यावर काढा मुंबईच्या काळजात खंजीर खूपसु नका असे सांगत कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान नव्या सरकारला केले, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार हे ठणकावून सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 25 टक्के काम झाले, आमच्या सत्ताकाळात ते शंभर टक्के करु असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत 'आरे वाचवा' या चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने कितीही प्रयत्न करू दे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आरेमधील नागरिकांनी घेतली आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत आरे कारशेडबाबत भाष्य केले. मेट्रो 3 कारशेड आरेमध्ये उभारण्यास शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर आरेतील कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता.

नव्या सरकारच्या या निर्णयावर पर्यावरणप्रेमी, आरेवासीयांसह सामान्य नागरिकांनीही नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर उतरून अथवा न्यायालयीन लढाईसाठी देखील आपण तयार आहोत. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणप्रेमी, आरेवासीयांनी नव्या सरकारला दिला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in