मुंबई : मेट्रो-६ च्या कामात ड्रिलिंग करताना अंधेरी पूर्व सिप्झजवळ १८०० मिमी. व्यासाची जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनी फुटल्याने अखेर मुंबई महापालिकेच्या जलविभागाने मेट्रो प्रशासनाला १ कोटी ३३ लाख ६२ हजार ४१२ रुपयांचा दंड ठोठावला असून तातडीने पालिकेच्या अंधेरी पूर्व विभाग कार्यालयात भरण्यास सांगितले आहे.
३० नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व सीप्झ गेट क्रमांक-३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मेट्रो-६ च्या कामात ड्रिलिंगचे काम सुरू असताना १८०० मिलिमीटर व्यासाच्या वेरावली मुख्य जलवाहिनीला धक्का बसला आणि जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आणि अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड, वांद्रे तसेच घाटकोपर, चांदिवली, कुर्ला, भांडूप आदी परिसरात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली. या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. अखेर ५० तासांच्या कामानंतर जलवाहिनी दुरुस्ती झाली आणि हळुहळू वरील भागात पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. मात्र मेट्रोच्या कामांत जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाच वॉर्डातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च झाले, याचा अहवाल तयार करून मेट्रो-६ चे काम करणाऱ्या इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंत्राटदाराला १ कोटी ३३ लाख ६२ हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी केली दंडात्मक कारवाई
पाणी वाया गेल्याने - २८,२०,८३०
दुरुस्ती खर्च - ६०,८७,४४४
५० टक्के अतिरिक्त दंड - ४४,५४,१३७
एकूण दंड - १,३३,६२,४१२