
मुंबई : म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये बनावट नावे घालून मोक्याच्या ठिकाणची घरे पदरात पडणे नागरिक आणि कार्यकारी अभियंत्यास चांगलेच महागात पडले आहे. म्हाडाच्या दक्षता विभागाने केलेल्या चौकशीतून हा घोटाळा उघडकीस आला आहे. मात्र कार्यकारी अभियंता बी २ यांनी पाठवलेला अहवाल मंजूर करणारे अधिकारी मात्र अद्यापही मोकाट आहेत.
धोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरते संक्रमण शिबिर उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने हजारो नागरिकांची पर्यायी वास्तव्याची व्यवस्था करून दिली आहे. जागेअभावी किंवा इतर कारणांनी मूळ इमारतीचे बांधकाम होत नसल्याने अशा इमारतींमधील रहिवाशांना मास्टरलिस्ट मार्फत घरे उपलब्ध करून देते.
मूळ उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नसल्याने संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येते. मंडळाकडून हक्काचे घर मिळेल या आशेवर अनेक रहिवाशी कित्येक दशके संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहेत. उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणारी घरे मास्टर लिस्टच्या माध्यमातून देण्यात येतात. मात्र यामध्ये एजंट आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले होते. यानंतर पुन्हा एकदा मास्टर लिस्टमधील गैरप्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाचे मिळकत व्यवस्थापक अवधूत बेळणेकर यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणात संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी कागदपत्र तपासणी न करता अहवाल दिला असून बृहतसूची समितीनेही मूळ यादी पडताळणी न करता पात्रता दिल्यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे घर घेणाऱ्या व्यक्ती आणि म्हाडाचे कार्यकारी अभियंता बी २ व्यक्तींविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनास नुकसान पोहोचवणे अशा भादंसं ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ जणांना घराचा लाभ -
दक्ष नागरिक जयश्री ढगे यांच्या तक्रारीवरून मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत भूसंपादन यादीमध्ये बेकायदेशीररीत्या १५ नावे समाविष्ट करण्यात आली. यामधील १३ जणांनी प्रत्यक्ष म्हाडाच्या घरांचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.