म्हाडाच्या एआय चॅटबॉटचे लोकार्पण; दिवाळीत मुंबई मंडळाची लाॅटरी नाही!

म्हाडाच्या मुंबई मंडळाची दिवाळीपूर्वी ५ हजार घरांची लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केली होती.
म्हाडाच्या एआय चॅटबॉटचे लोकार्पण; दिवाळीत मुंबई मंडळाची लाॅटरी नाही!
Published on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाची दिवाळीपूर्वी ५ हजार घरांची लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरली असून या दिवाळीत मुंबई मंडळाची लॉटरी निघणार नाही. मात्र या आर्थिक वर्षात लॉटरी काढण्यात येईल, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळाव्यात या उद्देशाने म्हाडाने आतापर्यंत नागरिक सुविधा केंद्र, अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली, आणि डीजी-प्रवेश यांसारख्या महत्त्वपूर्ण डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. या शृंखलेत आणखी एक अभिनव पाऊल टाकत, आज ‘म्हाडासाथी’ या एआय चॅटबॉट सेवेचे लोकार्पण ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले.

म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात म्हाडासाथी एआय चॅटबॉटचे प्रात्यक्षिक देताना जयस्वाल म्हणाले की, डिजिटायझेशनच्या युगात म्हाडाने आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करत नागरिकांसाठी उपयुक्त व तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हाडासाथी’ हा एजेन्टिक चॅटबॉट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असल्याने नागरिकांसाठी सोयीचा ठरणार आहे.

म्हाडाच्या सर्व नऊ विभागीय मंडळांशी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती या चॅटबॉटमध्ये नागरिकांना सहज मिळणार आहे.

भाडेतत्त्वावरील घरांची योजना लवकरच

मुंबईसह राज्यातील शहरांमध्ये मिळणार भाडेतत्त्वावरील घरे राज्याच्या गृहनिर्माण धोरणामध्ये भाडेतत्त्वावरील घरांच्या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार म्हाडाने भाडेतत्त्वावरील घरांची योजना राज्य सरकारकडे सादर केली आहे. या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिल्यास मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील प्रमुख शहरात भाडेतत्त्वावरील योजना राबविण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली. या योजनेमध्ये खासगी विकासकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

गिरणी कामगारांच्या घरांना स्थानिकांचा विरोध

गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्य सरकारने कल्याणमध्ये जमीन उपलब्ध करून दिली आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्यास विरोध केला आहे. जमिनीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यात आला. यामुळे येथे घरे उभारण्याऐवजी म्हाडाने दुसरा भूखंडावर घरे उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे.

नागरिकांचा वेळ वाचणार

‘म्हाडासाथी’ हा चॅटबॉटच्या दिशेने घेतलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्या टप्प्यात हा चॅटबॉट म्हाडाच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आला असून, याद्वारे नागरिकांना विविध विषयांवरील अचूक, विश्वासार्ह व तत्काळ माहिती मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात, ही सेवा लवकरच मोबाईल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, वारंवार कार्यालयात येण्याची गरज कमी होईल, प्रतीक्षा वेळ टळेल आणि अचूक माहिती त्वरित त्यांच्या हाती पोहोचेल, असे जयस्वाल म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in