
मुंबई : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
या पत्राद्वारे मंत्री लोढा यांनी म्हाडाकडे मागणी केली होती की, उपकर प्राप्त इमारतींना दिल्या गेलेल्या ७९ (ए) नोटिसीमुळे दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव मंजूर करून कामांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
म्हाडा मंडळाने मंत्री लोढा यांच्या सूचनेची दखल घेतली असून, सदर मागणी मान्य करत इमारतींच्या दुरुस्तीबाबतचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पावसाळ्यात नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेचे संभाव्य नुकसान टळणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी आधीच वितरीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कामांना वेगाने गती मिळणार असून, पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण होणार आहे.
‘त्या’ झोपडपट्टीवासीयांना आवाहन
मुंबई : पावसाळ्यातील धोका लक्षात घेता घाटकोपर विभागातील विक्रोळी पार्कसाइट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणी डोंगराळ परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना स्थलांतर होण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एन विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.