

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने दसऱ्याला सुमारे एक हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार दसऱ्याला घरांची जाहिरात प्रसिद्ध करून दिवाळीमध्ये प्राप्त अर्जांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये बहुतांश २० टक्के योजनेतील घरांचा समावेश आहे.
कोकण मंडळामार्फत दरवर्षी ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि कोकण भागातील घरांची लॉटरी काढण्यात येते. यामध्ये दरवर्षी २० टक्के योजना, म्हाडा योजना आणि शिल्लक घरांचा समावेश असतो. त्यानुसार मंडळाने दिवाळीमध्ये लॉटरी काढण्याची तयारी केली होती. या लॉटरीत मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमधून म्हाडाला मिळणाऱ्या २० टक्के योजनेतील तब्बल ६ हजार घरांचा समावेश होता. मात्र सरकारने २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे म्हाडाऐवजी थेट स्थानिक नियोजन प्राधिकरणांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची लॉटरी कशी काढायची असा पेच मंडळातील अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला होता.
अखेर मंडळाने २० टक्के योजनेतून यापूर्वी प्राप्त झालेल्या घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० टक्के योजनेतील सुमारे ८० टक्के तर शिल्लक २० टक्के घरांचा या लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सुमारे एक हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात दसऱ्याला काढण्यात येणार आहे. तर दिवाळीत प्राप्त अर्जांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे.