

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत नवीन वर्षाच्या प्रारंभी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी मुंबईत केली. या लॉटरीपासून अर्जदारांना अनामत रक्कम म्हाडाकडे न भरता स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा ठेवावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
म्हाडाच्या मुंबई मंडळाची २ हजार ६४० घरांची लॉटरी गुरुवारी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात आली. यावेळी जयस्वाल बोलत होते. “म्हाडाच्या वतीने दरवर्षी घरांसाठी लॉटरी काढली जाते. आजचा सोडत सोहळा हा त्याच नियमित प्रक्रियेचा एक भाग आहे. या वेळच्या लॉटरीला काहीसा विलंब झाला, याबाबत मी सर्व नागरिकांची मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
गेल्या ३ वर्षांत म्हाडाने राज्यभरात २५ लॉटरी जाहीर करून नागरिकांना ५० हजार घरे दिली आहेत. यापुढे ही मालिका सुरू राहणार असून जानेवारी २०२७ मध्ये म्हाडाची पुढील लॉटरी घोषित करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
सध्या महामुंबईत म्हाडाच्या माध्यमातून साडेसात लाख घरे उभारण्यात येत आहेत. म्हाडा ९२५ एकर जागेवर क्लस्टर प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६५ हजार मूळ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल. याशिवाय म्हाडाला ३० हजार घरे आणि खासगी क्षेत्राला १ लाख घरे उपलब्ध होणार आहेत.
म्हाडाला घरे न देणाऱ्या बिल्डरांना तुरुंगात पाठवा
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर अनेक बिल्डरांनी म्हाडाला घरे दिलेली नाहीत. या बिल्डरांवर केवळ एफआयआर दाखल करून त्यांना कारागृहात पाठवावे, अशी भूमिका कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली. लोढा म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी वॉर्ड निहाय स्थानिक लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ, वास्तुविशारद, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असलेल्या सल्लागार समिती स्थापन करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. या समित्यांमुळे नागरिक आणि म्हाडा प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन स्थानिक स्तरावरील समस्या तातडीने सोडविण्यास मदत होईल.
प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल - डॉ. पंकज भोयर
संपूर्ण देशातून लोक मुंबईत राहायला येत असल्यामुळे येथे घरांना प्रचंड मागणी आहे. म्हाडाच्या घरांसाठी येणाऱ्या अलोट अर्जांवरून लोकांना हक्काचे घर हवे असल्याचे स्पष्ट दिसते. म्हणूनच अर्ज करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर मिळावे या ध्येयाने सरकार काम करत आहे. नागपूर हे आता एक मोठे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत असल्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणावर घरे तयार केली जात आहेत. सरकार काही नवीन धोरणे आणत असून त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष घरे बांधली जात आहेत. तसेच नोकरदार महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल उभारण्यात येणार आहे.