अनिवासी गाळे विक्रीला मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी, अर्ज सादर करण्यासाठी मुदत

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील ८४ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीच्या ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र Photo : IANS
Published on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील ८४ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीच्या ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना २ फेब्रुवारीला रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरता येणार आहे तर ४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव संकेतस्थळावर होणार आहे तर ५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता निकाल जाहीर होणार आहे.

ई-लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे ४ अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ५, कोपरी पवई येथे १५, मॉडेल टाऊन मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे १, सिद्धार्थनगर गोरेगाव येथे १, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे, मालवणी मालाड येथे २९ अनिवासी गाळे, चारकोप येथे १२ अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या अनिवासी गाळ्यांची आधारभूत विक्री किंमत म्हाडाच्या सुधारित ठरवानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. या ठरवानुसार अनिवासी गाळ्यांची विक्री किंमत व्यावसायिक शीघ्रसिद्ध गणक दराच्या बरोबरीने १०० टक्के नुसार निश्चित करण्यात आलेली आहे.

कागदपत्रे, सविस्तर माहिती आवश्यक

ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. या लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada. gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in