
तेजस वाघमारे / मुंबई
बदली रोखण्यासाठी किंवा मलाईदार पदावर वर्णी लावण्यासाठी मंत्री लोकप्रतिनिधींमार्फत म्हाडा प्रशासनावर दबाव आणणाऱ्या तब्बल २५ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीला चाप लावण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार राजकीय व्यक्तीकडून दबाब आणल्याबद्दल वशिलेबाजांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांमध्ये समक्ष उपस्थित राहून खुलासा न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा म्हाडाने दिला आहे.
म्हाडा प्राधिकारणाने अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण निश्चित केले आहे. तसेच म्हाडातील विविध मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तक्रारीचे निवारण आणि वैयक्तिक कामे करून घेण्यासाठी खासदार, आमदार, राजकीय संघटनांचे कार्यकर्ते आणि इतर अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत त्यांची गाऱ्हाणी मंत्र्यांकडे नेऊ नयेत आणि तसे केल्याचे आढळून आल्यास ते शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतील, अशा प्रकारच्या सूचना शासनाने वेळोवेळी दिल्या आहेत. या सूचना म्हाडा प्राधिकरणाने परिपत्रकान्वये वेळोवेळी प्राधिकरणातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम-१९७९ मधील नियम-२३ मधील तरतुदीनुसार शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांच्या सेवे संबंधीच्या कोणत्याही बाबी संदर्भात राजकीय व्यक्तीकडून दबाब आणणे, ही गैरवर्तणूक असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे.
यानंतरही म्हाडातील अधिकारी कर्मचारी परिपत्रकांना केराची टोपली दाखवत मंत्री, खासदार, आमदारांमार्फत प्रशासनावर बदलीसाठी शिफारस पत्राद्वारे
दबाव आणत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या वर्तणुकीला चाप लावण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला असून तब्बल २५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम-१९७९ मधील नियम-२३ मधील तरतुदींच्या अनुषंगाने शिस्तभंगविषयक कारवाई का करू नये? याबाबत आपला
लेखी खुलासा या कार्यालयाकडे ४८ तासांमध्ये समक्ष उपस्थित राहून सादर करावा, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. लेखी खुलासा मुदतीमध्ये सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा म्हाडा प्राधिकरणातर्फे देण्यात आला आहे.
बदलीसाठी लोकप्रतिनिधींची शिफारस आणणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. संबंधितांनी मुदतीमध्ये खुलासा सादर न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. - नीलिमा धायगुडे, सचिव, म्हाडा प्राधिकरण