थायरॉईडग्रस्त महिलेवर 'मायक्रोवेव्ह एब्लेशन'; शस्त्रक्रिया पालिकेच्या भाभा रुग्णालयात अत्याधुनिक सूक्ष्म शस्त्रक्रिया यशस्वी

शस्त्रक्रियेमुळे रुग्ण महिला शस्त्रक्रियेनंतर काही तासातच आपले दैनंदिन काम करण्यास सक्षम झाली आहे
थायरॉईडग्रस्त महिलेवर 'मायक्रोवेव्ह एब्लेशन'; शस्त्रक्रिया पालिकेच्या भाभा रुग्णालयात अत्याधुनिक सूक्ष्म शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : थायरॉईड ग्रंथीच्या आजाराने घशाला येणाऱ्या सुजेमुळे खाण्यापिण्यासाठी त्रास होणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेवर 'मायक्रोवेव्ह एब्लेशन' (एम. व्ही. ए.) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून के. बी. भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटात झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे, बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर थायरॉईड विषयक उपचारासाठी करण्यात आला आहे. यानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेला अवघ्या २ तासानंतर खाण्यास, बोलण्यास व चालण्यास संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी अनुमती दिली आहे. या महिलेला संबंधित आजार व त्रासापासून दिलासा मिळाला आहे, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे.

भाभा रुग्णालयातील ज्यांनी ही शस्त्रक्रिया केली त्या कान नाक व घसा विभागातील डॉ. आम्रपाली पवार यांनी सांगितले की, वांद्रे परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयातील कान नाक व घसा विभागात काही दिवसांपूर्वी घशाच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेली ३२ वर्षीय संगीता (नाव बदललेले) ही महिला उपचारासाठी आली होती. सदर महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांच्या घशातील थायरॉईड ग्रंथींना मोठ्या प्रमाणात सूज असल्याचे आढळून आले. अशा प्रकारची सूज असल्यास सामान्यपणे गळ्यावर छेद देऊन शस्त्रक्रिया करण्यात येते. अशाप्रकारे करण्यात येणारी करण्यात येणारी शस्त्रक्रिया ही नाजूक व अवघड अशी शस्त्रक्रिया मानली जाते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

अत्याधुनिक एम. व्ही. ए. हे तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेत सोनोग्राफीच्या सहाय्याने व एक सूक्ष्म सुई द्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात झालेल्या या शस्त्रक्रिये अंतर्गत सुईद्वारे थायरॉईड मधील बाधीत पेशी नष्ट करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांनी सदर महिला रुग्ण रुग्णास बोलण्याची अनुमती देण्यात आली. तसेच चालण्याची, फिरण्याची व खाद्यपदार्थ खाण्याची देखील परवानगी देण्यात आली. तर नंतर अवघ्या काही तासांनी सदर रुग्ण महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

प्रतिक्रिया

या शस्त्रक्रियेचा कोणताही व्रण रुग्णाच्या शरीरावर नव्हता. एम. व्ही. ए. तंत्रज्ञान वापरून केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण महिला शस्त्रक्रियेनंतर काही तासातच आपले दैनंदिन काम करण्यास सक्षम झाली आहे.

- डॉ. आम्रपाली पवार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in