हलक्या पावसात मिलन सब-वे जलमय होण्याचा धोका यंदाच्या पावसाळ्यात टळणार आहे. मिलन सब-वेमध्ये पावसाचे पाणी साचल्यास पाण्याचा उपसा करण्यासाठी हाय पावरचे पाच पंप बसवण्यात येणार आहेत. या पंपाच्या साहाय्याने तासाला ३ हजार क्युबीक मीटर पाण्याचा निचरा होणार आहे. उपसा केलेले पाणी भूमिगत पाण्याच्या टाकीत सोडण्यात येईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मिलन सब वे पूरमुक्त असेल आणि सांताक्रुझ परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू राहील, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दहिसर सब-वेपासून अनेक भुयारी मार्ग हे रेल्वे लाइन पश्चिम द्रुतगती मार्गांच्या खाली आहेत. त्यात सब-वेची उंची व खोली वाढवणे शक्य होत नसल्याने मिलन सब-वे हलक्या पावसात ही जलमय होतो. पावसाळ्यात बरसणाऱ्या हलक्या सरी आणि अतिवृष्टीत आधीच शहरात वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण पावसाळ्यात पंप बसवून पाणी उपसण्याचे काम पालिकेला करावे लागते. मात्र पंपांची क्षमता मर्यादित असल्याने सब-वे पूरमुक्त करण्यासाठी पालिका भूमिगत टाक्यांचा प्रयोग करीत आहे. परळचे हिंदमाता हे ठिकाणी भूमिगत टाक्यांच्या प्रयोगामुळे पूरमुक्त झाले आहे. तर आता मीलन सब-वेदेखील पूरमुक्त झाला आहे. मीलन सब-वे पूरमुक्ती प्रकल्पासाठी २३ कोटी ३८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.