Video : अखेर मिलिंद देवरा शिंदेंच्या गोटात सामील; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

Video : अखेर मिलिंद देवरा शिंदेंच्या गोटात सामील; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

देवरा यांनी आज सकाळी आपण काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली होती.

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती त्यांनी पक्षप्रवेश केला. देवरा यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. देवरा यांनी आज सकाळी आपण काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली होती. यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. आता त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आजची काँग्रेस आणि 1968 ची काँग्रेस मध्ये खूप फरक आहे. आज या पक्षाचा फक्त मोदींना विरोध करणे एवढे आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे आहेत. आज मोदींच्या नेतृत्वा भारत अधिक मजबूत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक जमीनीवरचे नेते आहेत. मोदीजी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भारत आणि मुंबई अधिक सुरक्षित आहे, असे देवरा म्हणाले. यावेळी देवरा यांनी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

मुरली देवरा यांचे मुंबईसाठी योगदान आहे. बघायला गेले तर आपल्यात साम्य आहे. काही लोक दुसऱ्यासाठी जगत असतात. मला काय मिळाले यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्वाचे, असेच बाळासाहेब ठाकरे आणि मुरली देवराजी होते. तुम्ही उच्च शिक्षित आहात. देशासाठी काय करता येईल याचे व्हिजन ठेवून काम करणाऱ्या लोकांची देशाला गरज आहे. मी आपल्याला नेहमी जवळून पाहिले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या भानगडीत न पडता आपण आपले काम करतात, असे एकनाथ शिंदे देवरा यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, देवरा हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सूरू असताना त्यांनी त्या फेटाळल्या होत्या. “मी अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा आहेत. त्या निराधार आहेत. मला विश्वास आहे की काँग्रेस नेतृत्व पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेचा विचार करेल”, असे देवरा यांनी शनिवारी म्हटले होते. ते त्यांच्या समर्थकांसोबत काही योजना करत आहेत का, असे विचारले असता, "मी माझ्या समर्थकांचे म्हणणे ऐकत आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही", असेही त्यांनी सांगितले होते.

logo
marathi.freepressjournal.in