यापुढे आझाद मैदानावर आंदोलन नकोच! खासदार मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर पाच दिवस आंदोलन झाले. या पाच दिवसांत विशेष करून दक्षिण मुंबई ठप्प झाली, कार्यालये बंद ठेवावी लागली.
यापुढे आझाद मैदानावर आंदोलन नकोच! खासदार मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Published on

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर पाच दिवस आंदोलन झाले. या पाच दिवसांत विशेष करून दक्षिण मुंबई ठप्प झाली, कार्यालये बंद ठेवावी लागली. दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यापुढे आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

आंदोलन करण्याचा प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र आंदोलन करताना तो सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारांशी संतुलित असला पाहिजे. दक्षिण मुंबई हे केवळ आपल्या राज्याच्या प्रशासनाचे हृदयच नाही तर त्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र देखील आहे. त्यामुळे आझाद मैदानावर आंदोलन नकोच असे देवरा म्हणाले.

आंदोलन काळात दक्षिण मुंबईतील जनजीवन ठप्प!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले. पाच दिवस आंदोलन झाले, मात्र आंदोलनादरम्यान आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान व परिसरातील रस्त्यांवर कब्जा केला होता. पाच दिवसांच्या आंदोलन काळात दक्षिण मुंबईतील जनजीवन ठप्प झाले होते. याचा त्रास या भागातील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना झाला, असे देवरा यांनी पत्रात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in