मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अशी ओळख असणारे त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून मिलिंद नार्वेकर यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. सध्या उद्धव यांनी नार्वेकर यांना दूर सारत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे यांना जवळ केले आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेला बळ मिळत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही तसे संकेत दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी जूनमध्ये बंड केल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर पक्षात फारसे सक्रिय दिसत नव्हते. त्यातच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्यामुळे त्यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर गणपतीला नार्वेकरांच्या घरी जाऊन दर्शनही घेतलं. मातोश्रीला मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी विश्वास उरला नाही. त्यामुळे त्यांच्या जागी नुकतीच रवींद्र म्हात्रे यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे नार्वेकर मातोश्रीपासून आणखी दूर गेले. गुलाबराव पाटील यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत आहेत, असं वक्तव्य केले आहे.