गिरणी कामगार आक्रमक; उद्या लालबाग, भारतमाता येथे घरांच्या प्रश्नी आंदोलन

मुंबईच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांची आजही हक्काच्या घरांसाठी वणवण सुरू आहे.
गिरणी कामगार आक्रमक; उद्या लालबाग, भारतमाता येथे घरांच्या प्रश्नी आंदोलन
Published on

मुंबई : मुंबईच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांची आजही हक्काच्या घरांसाठी वणवण सुरू आहे. राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केला असून घरांच्या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी २९ फेब्रुवारीला लालबाग, भारतमाता येथे सकाळी ११ वाजता आंदोलन करण्याचा इशारा गिरणी कामगारांनी दिला आहे.

गिरणी कामगार संघर्ष समितीने गिरणी कामगारांना घरे द्या, एनटीसी व खासगी गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घ्या, सरकारी व महसुली भूखंडांना कामगार संघटनांच्या प्रस्तावानुसार मंत्रिमंडळाची मान्यता द्या, एमएमआरडीएच्या तयार घरांची दुरुस्ती करून लॉटरी काढा, पनवेल येथील कोन गावातील घरांची दुरुस्ती करून तिथे पाणी उपलब्ध करून सर्व सोयीसुविधायुक्त घरे कामगारांना द्या, संक्रमण शिबिरातील घरे कामगारांना द्या व तो कायदा रद्द करा, या मागण्यांसाठी १४ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चा काढला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कामगार या मोर्चात सामील झाले होते.

यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी चर्चा करून २१ किंवा २२ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांना अनेकदा फोन केले. त्यांच्या पीएकडे संपर्क साधल्यानंतरही सावे यांनी काहीच केले नाही.

logo
marathi.freepressjournal.in