गिरणी कामगार हक्काच्या घरात; १४२ कामगार, वारसांना घराच्या चाव्यांचे वाटप

या अभियानाला गिरणी कामगार, वारसांचा वाढता प्रतिसाद बघता १५ मार्चपर्यंत मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे.
गिरणी कामगार हक्काच्या घरात; १४२ कामगार, वारसांना घराच्या चाव्यांचे वाटप

मुंबई : म्हाडातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १४२ यशस्वी पात्र गिरणी कामगार, वारसांना बाराव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते करण्यात आले.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राणे यांनी संगितले की, आजवर सुमारे २५०० पात्र गिरणी कामगार/वारसांना हक्काचा निवारा मिळवून देण्याकामी आम्ही खारीचा वाटा उचलला आहे परंतु २०१६ रोजीच्या पनवेलमधील मौजे कोन येथील गृहप्रकल्पातील सोडतीतील ५८५ सदनिकांचे लाभर्थ्यांना वितरण करण्यात यश मिळाले आहे, याचे अधिक समाधान होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एमएमआरडीएच्या अखत्यारितील रांजनोळी येथील गृहप्रकल्पातील सदनिकांची सोडत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी जाहीर करण्यासाठी गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती आग्रही आणि प्रयत्नशील आहे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली तसेच ते पुढे म्हणाले की गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी अभियान

बृहन्मुंबईतील ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीत यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. या अभियानाला गिरणी कामगार, वारसांचा वाढता प्रतिसाद बघता १५ मार्चपर्यंत मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोकण मंडळाच्या ५,३११ घरांची लॉटरी आज

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे कोंकण विभागातील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या वितरणासाठी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in