पर्यटकांचे आकर्षण असलेल्या टॉय ट्रेनचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. मध्य रेल्वेकडून मागील अनेक दिवसांपासून नेरळ-माथेरान हिल रेल्वे मार्गावर टॉय ट्रेनच्या रुळावरून घसरण्याचा घटना टाळण्यासाठी काँक्रीट स्लीपर टाकले जात आहेत. आतापर्यंत ६० टक्के हे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय पावसाच्या पाण्याचा सुरळीत प्रवाह होण्यासाठी नाले, पूल आणि क्रॅश बॅरियर्स, राखीव भिंती देखील मध्य रेल्वेकडून बांधल्या जात आहेत. यामुळे येत्या डिसेंबरपासून नेरळ-माथेरान हिल रेल्वे मार्गावर टॉय ट्रेनद्वारे पर्यटकांना सुरक्षित आणि तितकाच आनंददायी प्रवास करणे शक्य होणार असून पर्यटकांना टॉय ट्रेनने लोकप्रिय हिल स्टेशनला जाणारा २० किमीचा संपूर्ण वळणाचा रस्ता अनुभवता येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये माथेरान असल्याने पर्यटकांचा प्रवास नयनरम्य मार्गाने होतो. या ठिकाणी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते ती टॉय ट्रेन. या ट्रेनद्वारे माथेरानच्या डोंगरदऱ्यांच्या प्रवास पाहायला मिळतो; मात्र हीच मिनी टॉय ट्रेन सेवा २०२० मधील चक्रीवादळामुळे विस्कळीत झाली होती. तर बऱ्याचदा या ट्रेनचे रुळावरून घसरणे, आजूबाजूच्या डोंगर रस्त्यांचे भूस्खलन होण्याचा घटनांमुळे ही ट्रेन सेवा ठप्प होत होती. या सर्व बाबी लक्षात घेत मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान टॉय ट्रेन मार्गाच्या पुनर्बांधणीच्या कामाला मागील काही महिन्यांपासून सुरुवात केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूददेखील करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या पर्यटक दस्तुरी नाक्यापर्यंत रस्तेवाहतूक करतात. त्यानंतर वाहनांना परवानगी नाही आणि तेथून अमन लॉज ते माथेरानच्या मध्यभागी २ किमी अंतरावर टॉय ट्रेनमध्ये चढण्यासाठी ५० मीटर चालत अंतर पार करतात; मात्र सध्या वेगाने सुरू असलेल्या कामांमुळे नेरळ-माथेरान हिल रेल्वेमार्गावर ६० टक्क्यांपेक्षा जास्त काँक्रीट स्लीपर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.