शिंदे गटातील नेत्याची मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? अडचणी वाढण्याची शक्यता

शिंदे गटातील हा नेता याआधीही अनेक वादांमुळे चर्चेत राहिला आहे. आरोप झाल्यानंतर हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले.
शिंदे गटातील नेत्याची मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? अडचणी वाढण्याची शक्यता

शिंदे गटातील आमदार नेते संजय बांगर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांच्यावर मंत्रालयाच्या गेटवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्रालयामध्ये जात असताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले आणि शिवीगाळ केला असा आरोप करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबरला घडली असून हिंगोलीचे आमदार संजय बांगर आपल्या १५ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयामध्ये जात असताना गेटवर पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवले. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. पोलीस कर्मचाऱ्याने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. मात्र संजय बांगर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

संजय बांगर यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हंटले आहे की, “मी कुठल्याही प्रकारे पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातलेली नाही. मी काही कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयामध्ये जात असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्याने रीतसर प्रवेशाची नोंद करण्यास सांगितले. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचे सांगितले. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखले नव्हते. पण ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवले. माझ्या स्वीय सहाय्यकाने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही. आणि जर हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in