राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला न्यायालयाने मंजूर

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला न्यायालयाने मंजूर

राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात विविध कलमान्वये अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी बच्चू कडूंनी अकोला जिल्हा न्यायालयात पुन्हा अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने बुधवारी निर्णय देत त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर केला आहे.

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून बच्चू कडूंनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचितने केला होता. यासंदर्भात वंचितने राज्यपालांकडे बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयाने या प्रकरणात अपहार झाल्याचे प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले. त्यानुसार ४०४, ४०९, ४६८, ४७१, ४२० या विविध कलमान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंनी पहिल्यांदा २८ एप्रिल रोजी अकोला जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आणि ९ मेपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा कडूंनी ९ मे रोजी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली आणि पुन्हा एकदा त्यांना दिलासा मिळाला.

Related Stories

No stories found.