

भाईंंदर : भाईंदरच्या उत्तन चौक येथील बालेपिर शाह दर्ग्याजवळ एका ७५ वर्षीय व्यक्तीला दोन अल्पवयीन मुला-मुलीने डोक्यात लादी व दगड मारून खून करून मृतदेह झाडाझुडुपांमध्ये फेकल्याप्रकरणी १६ वर्षीय मुलीला व १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. बालेपीर शाह दर्ग्याजवळ एक व्यक्ती बाथरूमला जाण्यासाठी पडला असावा व तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचा उग्र वास येऊ लागल्याने माजी नगरसेवक अमजद शेख यांनी उत्तन पोलिसांना कळवल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मयत किशोर ब्रिजमोहन मिश्रा (७५) यांचा मुलगा किशोर मिश्रा यांच्या तक्रारींवरून बेपत्ता झाल्याची नोंद नायगाव पोलीस ठाणे हद्दीत केली होती. नायगाव पोलीस ठाण्यातील हवालदार देविदास पाटील यांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करून नायगावमध्ये मयत यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसह तिचा भाईंदर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मित्रास ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी मिश्राने काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला रात्री उशिरा रिक्षात फिरवत तिचा विनयभंग केला. मिश्राचा हेतू चांगला नसल्याचे ओळखून मुलीने तिच्या भाईंदर येथील मित्रास बोलावले. उत्तन नाका ते डोंगरी मार्गे रिक्षात बसून पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न मिश्राने केल्याने तिने व मित्राने त्याची हत्या केली व मृतदेह शौचालयाचे जवळील झुडपात फेकून दिला.