मुंबई : आई-वडिलांनी मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना माहीम येथे घडली आहे. मुलीचे नाव मुतुपेची नटराजन असून ती नववीत शिकत होती.
माहीम पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री एक फोन आला. त्यात माहीम पोलीस वसाहती समोरील ‘बीएन ९’ इमारतीवरून उडी मारून एका १३ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी तिला तत्काळ सायन रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित केले.
मुतुपेचीला मोबाईलवर गेम खेळायचे व्यसन जडले होते. ‘तू नववीला गेल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. मोबाईलवर गेम खेळू नको,’ असे तिला पालकांनी बजावले. याचा राग येऊन तिने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांनी या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले.