
मुंबई: अंधेरीतील मरोळ मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अश्लील इशारे करून या तरुणाने तिला स्वत:जवळ बोलाविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तक्रारदार मुलगी क्लासवरून मेट्रोने मरोळ रेल्वे स्थानकात उतरली असताना तिच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने तिच्याकडे पाहून अश्लील इशारे केले, तिला बोलाविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी निघून गेली. तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.