मीरा-भाईंंदरमध्ये १० टक्के पाणीकपात लागू; आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा खंडित

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने १९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
मीरा-भाईंंदरमध्ये १० टक्के पाणीकपात लागू; आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा खंडित
मीरा-भाईंंदरमध्ये १० टक्के पाणीकपात लागू; आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा खंडितप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने १९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) होणारा पाणीपुरवठा आठवड्यातील ठरावीक कालावधीत बंद राहणार आहे.

महापालिकेच्या नियोजनानुसार, स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत, म्हणजेच १८ तास बंद राहील. तर एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा दर गुरुवारी मध्यरात्री १२ ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत, म्हणजेच ३६ तास खंडित राहणार आहे. या वेळापत्रकामुळे शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कमी पावसाची शक्यता, मान्सूनची लवकर माघार आणि पुढील वर्षी अल निनोच्या संभाव्य प्रभावाचा विचार करून पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपलब्ध पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे.

पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही भागांत कमी दाबाने किंवा उशिराने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीचा विचार करून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून अनावश्यक अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी केले आहे.

या पाणीकपातीमुळे गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना आणि सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in