४३६ विहिरींसह १४ तलाव गायब! नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मीरा-भाईंदर शहरात सातत्याने जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक जलस्रोत नामशेष झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगर परिषद काळातील नोंदीनुसार शहरात ५०८ विहिरी आणि ३५ तलाव होते.
४३६ विहिरींसह १४ तलाव गायब! नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी
४३६ विहिरींसह १४ तलाव गायब! नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशीची मागणीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

धीरज परब/भाईंदर

मीरा-भाईंदर शहरात सातत्याने जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक जलस्रोत नामशेष झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगर परिषद काळातील नोंदीनुसार शहरात ५०८ विहिरी आणि ३५ तलाव होते. मात्र, सध्या केवळ ७२ विहिरी आणि २१ तलाव शिल्लक असल्याची माहिती आहे. म्हणजेच तब्बल ४३६ विहिरी आणि १४ तलाव गायब झाले आहेत. वाढत्या बांधकामांमुळे अनेक विहिरी आणि तलाव बुजविण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.

राज्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना त्याचे परिणाम आतापासूनच जाणवू लागले आहेत. मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांनाही दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहराला एमआयडीसी आणि स्टेमकडून दररोज सुमारे २०० ते २१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेता शहराला दररोज सुमारे २८० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते. असे असताना शहरातील पूर्वापार अस्तित्वात असलेल्या विहिरी आणि तलाव या महत्त्वाच्या जलस्रोतांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. पूर्वी भाईंदर, गोडदेव, नवघर, खारी, घोडबंदर, मिरे, काशी, वरसावे, चेणे, मुर्धा, राई, मोरवा, डोंगरी, तरोडी, चौक, पाली आणि उत्तन आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विहिरी व तलाव होते.

विहिरी आणि तलाव हे पाण्याचे स्रोत असण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी या जलस्रोतांमध्ये साठते. त्यामुळे पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढण्यास मदत होते. तसेच अतिरिक्त पाणी साठवून ठेवल्यामुळे पूरस्थितीची तीव्रता कमी होण्यासही हातभार लागतो.

वाढत्या बांधकामांमध्ये जलस्रोतांचा बळी

नगर परिषद काळातील नोंदीनुसार शहरात ११५ सार्वजनिक आणि ३९३ खासगी अशा एकूण ५०८ विहिरी होत्या. तसेच ३२ सार्वजनिक आणि तीन खासगी असे एकूण ३५ तलाव अस्तित्वात होते. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार केवळ ५२ सार्वजनिक आणि २० खासगी विहिरी शिल्लक आहेत. त्यामुळे ६३ सार्वजनिक आणि सुमारे ३७३ खासगी विहिरींची नोंद गायब झाली आहे. त्याचप्रमाणे ३५ तलावांपैकी १४ तलाव अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. वाढत्या बांधकामांमुळे अनेक विहिरी बुजविण्यात आल्या, तर तलावांच्या जागांवरही अतिक्रमणे आणि बांधकामे झाल्याचे आरोप आहेत. वास्तविक, विहिरी आणि तलावांचे संरक्षण होणे आवश्यक असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांकडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका होत आहे.

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

एकीकडे महापालिका सार्वजनिक विहिरी आणि तलावांच्या स्वच्छता व देखभालीसाठी खर्च करत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे शेकडो जलस्रोत गायब झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गायब झालेल्या विहिरी आणि तलाव नेमके कुठे गेले, त्यांच्या जागांवर बांधकामे झाली आहेत का आणि याला जबाबदार कोण, याची सखोल चौकशी करावी. उर्वरित जलस्रोतांचे संरक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)