मीरा-भाईंदरला आता 'वरिष्ठ' न्यायालय; ठाणे न्यायालयावरील ताण होणार कमी, २५ किमीची पायपीट थांबणार

मिरा-भाईंदरकरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने मीरा रोड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
मीरा-भाईंदरला आता 'वरिष्ठ' न्यायालय; ठाणे न्यायालयावरील ताण होणार कमी, २५ किमीची पायपीट थांबणार
मीरा-भाईंदरला आता 'वरिष्ठ' न्यायालय; ठाणे न्यायालयावरील ताण होणार कमी, २५ किमीची पायपीट थांबणार
Published on

भाईंदर : मिरा-भाईंदरकरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने मीरा रोड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीशांमार्फत २४ ऑगस्टला जारी करण्यात आला. त्यामुळे हत्या, पोस्को यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह मोठे दिवाणी व आर्थिक दावे आता स्थानिक पातळीवरच चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या मिरा भाईंदरच्या मिरारोड न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे मर्यादित स्वरूपाच्या दिवाणी दाव्यांसह किरकोळ गुन्ह्यांचीच सुनावणी येथे होत होती. मात्र, नव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामुळे हत्या, पॉक्सो आणि इतर गंभीर स्वरूपाचे ७०० हून अधिक खटले मिरारोड न्यायालयात चालवले जाण्याची शक्यता आहे तसेच १,७०० हून अधिक मोठे दिवाणी व आर्थिक खटले ठाणे जिल्हा न्यायालयातून मीरा रोड न्यायालयात वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे ठाणे न्यायालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

न्यायदालनातून कामकाज

नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या काही अटींमध्ये उच्च न्यायालयाच्या समितीने शिथिलता दिली आहे. मीरा रोड येथील सहा न्यायाधीशांची क्षमता असलेल्या विद्यमान न्यायालयीन इमारतीत पुरेशी जागा उपलब्ध असल्याने सुरुवातीला तेथूनच नव्या न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे.

निर्णय महत्त्वपूर्ण

मीरा-भाईंदर परिसरातील पोलीस ठाणे, महसूल विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रकरणांसाठी नागरिक आणि वकिलांना सुमारे २५ किलोमीटरचा प्रवास करून ठाणे जिल्हा न्यायालय गाठावे लागत होते. ८ मार्च २०२५ रोजी मीरा रोड येथे कनिष्ठ स्तराचे न्यायालय सुरू झाल्यानंतरही वरिष्ठ स्तरावरील प्रकरणांसाठी ठाण्याची वारी कायम होती. प्रलंबित खटल्यांमुळे मीरा रोड येथे वरिष्ठ स्तराचे न्यायालय सुरू करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in