

भाईंंदर : मीरा-भाईंदर परिसरातील मीरारोड पूर्व येथील प्रभाग क्र. १२ मधील भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध एका ४० वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली असून मीरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, जुलै २०२२ पासून आरोपीने महिलेची ओळख वाढवून तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर विविध ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप आहे. मीरारोड येथील कार्यालयात तसेच इतर ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे महिलेने नमूद केले आहे. तसेच तक्रार दिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, सुरुवातीला गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. अखेर उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिलेविरुद्धही खंडणीचा गुन्हा
या प्रकरणात आणखी एक वळण आले असून, आरोपीच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाणे येथे संबंधित महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.