

भाईंदर: मीरा भाईंदर महापालिकेत ९५ पैकी ७८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपकडून महापौरपदासाठी डिंपल मेहता तर उपमहापौरदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मेहता व पाटील यांची अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपला ७८, काँग्रेसला १३, शिवसेना शिंदे गटाला ३ आणि अपक्षाला १ जागा मिळाल्या आहेत. प्रशासनाने महापौर निवडीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
भाजपकडून डिंपल मेहता महापौरपदासाठी तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौरपदासाठी अर्जदार आहेत. तसेच, मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या काँग्रेसच्या रुबीना शेख यांनी महापौरपदासाठी तर शिवसेना शिंदे गटाच्या वंदना विकास पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
महापौरपद आमदार मेहतांच्या कुटुंबात
मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने ७८ जागा जिंकल्याने महापौर व उपमहापौरपदे देखील भाजपकडे जाणे निश्चित आहे. निवडणूक फक्त औपचारिकता म्हणून पार पडणार आहे. डिंपल मेहता हे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा लहान भाऊ आणि विनोद मेहतांच्या पत्नी आहेत. डिंपल मेहता २०१७ साली देखील महापौर होत्या. आ. मेहतांच्या कुटुंबातील असल्यामुळे त्यांना यंदा पुन्हा महापौरपदाची संधी देण्यात आली आहे.