मीरा-भाईंंदरमध्ये भाजप व शिंदे गट स्वबळावर; जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेरपर्यंत महायुती होणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली नाही. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीही अस्तित्वात आली नाही. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मीरा-भाईंंदरमध्ये भाजप व शिंदे गट स्वबळावर
मीरा-भाईंंदरमध्ये भाजप व शिंदे गट स्वबळावर
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेरपर्यंत महायुती होणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली नाही. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीही अस्तित्वात आली नाही. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युती किंवा आघाडी होईल या आशेवर अनेक इच्छुक उमेदवार शेवटपर्यंत थांबले होते. मात्र अखेरच्या दिवशीही युती न झाल्याने अनेकांनी एबी फॉर्मची वाट पाहत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे तसेच अन्य पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामांकन दाखल केले.

दरम्यान, काही विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांची अदलाबदल करण्यात आली असून, काहींची तिकिटे कापण्यात आल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. मीरा-भाईंदर शहरात शिवसेना-भाजप युती अथवा काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची आघाडी न झाल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मैदानात उतरले.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण १,८२४ नामनिर्देशन अर्ज इच्छुक उमेदवारांनी उचलले होते. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, रिपब्लिकन पार्टी, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

भाजप महिला पदाधिकाऱ्यालाही धक्का

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांनाही अस्वस्थतेचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. मुलगी श्रद्धा बने यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्या भावनिकदृष्ट्या व्यथित झाल्या होत्या. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

उमेदवाराचा मृत्यू

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडलेल्या एका उमेदवाराचा अचानक मृत्यू झाला. जावेद पठाण ( ६६) असे मृत उमेदवाराचे नाव असून, त्यांनी प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ३० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज सादर करून बाहेर आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in