मीरा-भाईंदरमध्ये बसभाड्याचा झटका! साध्या बसच्या भाड्यात वाढ; एसी बस स्वस्त

मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेचा दर्जा आणि वारंवार रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होत असतानाच आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदरमध्ये बसभाड्याचा झटका! साध्या बसच्या भाड्यात वाढ; एसी बस स्वस्त
मीरा-भाईंदरमध्ये बसभाड्याचा झटका! साध्या बसच्या भाड्यात वाढ; एसी बस स्वस्तसंग्रहित छायाचित्र
Published on: 

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेचा दर्जा आणि वारंवार रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होत असतानाच आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. साध्या बसच्या तिकीटदरात दोन ते १२ रुपयांची वाढ, तर वातानुकूलित (एसी) बसच्या भाड्यात अंतरानुसार पाच ते ३५ रुपयांची कपात करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. सत्ताधारी भाजपच्या बाजूने ७१, तर काँग्रेस आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी विरोधात १६ मते दिली. मात्र, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच नवे दर लागू होतील.

महापालिका प्रशासनाने डिझेल, वीज, टायर, सुटे भाग आणि बसच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाल्याचे कारण देत भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला. साध्या बसेसचे विद्यमान दर २०१३ पासून, तर एसी बसेसचे दर २०१६ पासून कायम असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रस्तावानुसार, साध्या बसच्या पहिल्या दोन किलोमीटरसाठीचे भाडे सहा रुपयांवरून आठ रुपये होणार आहे. २८ ते ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी २६ रुपयांऐवजी ३६ रुपये, तर ३८ ते ४० किलोमीटरसाठी ३२ रुपयांऐवजी ४६ रुपये मोजावे लागतील.

दुसरीकडे, एसी बसच्या पहिल्या दोन किलोमीटरचे भाडे २० रुपयांवरून १५ रुपये करण्यात येणार आहे. १० ते १२ किलोमीटरसाठी ५० रुपयांऐवजी २५ रुपये, तर ३८ ते ४० किलोमीटरसाठी १०० रुपयांऐवजी ६५ रुपये आकारण्याचे प्रस्तावित आहे. एसी बसचे दर शेजारील महापालिकांच्या तुलनेत स्पर्धात्मक करून प्रवासीसंख्या वाढविण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.

महापालिकेकडे ७४ डिझेल आणि ५७ इलेक्ट्रिक अशा एकूण १३१ बसेस आहेत. आणखी १०० इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यानंतर ताफा २३१ बसेसपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या केवळ ३९ डिझेल बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाडेवाढीबरोबरच बससेवेचा दर्जा सुधारण्याची मागणी होत आहे.

काँग्रेसचा विरोध

काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर यांनी भाडेवाढीला विरोध केला. प्रवाशांना पुरेशा सुविधा मिळत नसताना अधिक भाडे आकारणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी जुने दर कायम ठेवण्याची मागणी केली. मात्र, भाजपने बहुमताने प्रस्ताव मंजूर केला. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. भाडेवाढीपूर्वी बससेवा सुधारण्याची हमी प्रशासन देणार का, हा प्रश्न कायम आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in