
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल असून, संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती मिळत आहे.
जुलै २०२५ मध्ये ५४ वर्षीय रुग्णाचा हिवतापाने मृत्यू झाला होता. तर ३१ ऑगस्ट रोजी भाईंदर (प.) येथील राममंदीर परिसरातील ५३ वर्षीय व्यक्तीचा संशयित डेंग्यूमुळे मीरारोड येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. उत्तन व चौक परिसरात गेल्या काही दिवसांत किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद खासगी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. मात्र या मृत्यूंची अधिकृत नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अद्याप नाही.
डासांची पैदास रोखण्यासाठी औषध फवारणी, जेट स्प्रे टेम्पोमार्फत आठवड्यातून एकदा अळीनाशकांची फवारणी, रक्तनमुने तपासणी, दूषित रुग्णांना समूळ उपचार, तसेच कंटेनर सर्वेक्षण अशी उपाययोजना प्रशासनाने सुरू केली आहे.
डासांची पैदास होणाऱ्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, विशेष मोहीम राबवणे आणि गप्पी मासे पैदास केंद्रांची देखरेख केली जात आहे.
आपले आरोग्य आपल्या हातात आहे या तत्त्वानुसार नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे. घराजवळील डबके व सोसायटी परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मीरा-भाईंदरला डेंग्यू-मलेरियामुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.
राधाबिनोद शर्मा, पालिका आयुक्त
महापालिकेमार्फत जनजागृती मोहीम
डेंग्यू-मलेरियाबाबत जनजागृती करण्यासाठी गटसभा, शालेय आरोग्य शिक्षण, माहितीपत्रके वाटप, तसेच सोसायटींना आवाहनपत्र देणे सुरू आहे. इमारतीमध्ये फवारणी वेळापत्रक व आरोग्य कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांकही लावण्यात आले आहेत. नागरिकांनी घराभोवती, गच्ची, बाल्कनी किवा इतरत्र पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. जुने टायर, नारळाच्या करवंट्या, रिकाम्या
बाटल्या तत्काळ हटवाव्यात. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या घट्ट झाकाव्यात, कूलरमधील पाणी २-३ दिवसांनी बदलावे. रात्री मच्छरदाणी वापरावी. बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावेत. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व स्वतः औषधे घेऊ नयेत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.