

भाईंंदर : नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पडसाद थेट पोलीस ठाण्याच्या आवारात उमटले. मीरारोड येथील नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांतील व्यक्तींमध्येच हाणामारी झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोड येथील शांतीनगर सेक्टर क्रमांक ३ मधील ‘मंत्र उत्सव’ या सार्वजनिक नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमादरम्यान दोन गटांत वाद झाला होता. या वादासंदर्भात तक्रार देण्यासाठी दोन्ही गटांतील व्यक्ती १३ ऑक्टोबर रोजी नयानगर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. मात्र, पोलीस ठाण्याच्या आवारातील मोकळ्या जागेतच दोन्ही गटांतील व्यक्तींमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी सचिन गुप्ता, मोहित चौरसिया, प्रदीप पटेल आणि तरुण मकवाना या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.