Mira- Bhayandar : पालिकेत फेरीवाला ओळखपत्र वाटपावरून वाद! खासगी कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या फेरीवाला व्यवस्थापनात अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. फेरीवाला समितीला कोणतीही पूर्वसूचना न देता आणि लेखी आदेश नसताना, बाजार शुल्क वसुलीचे कंत्राट असलेल्या खासगी कंपनीकडून महापालिकेचे नाव, लोगो आणि नोंदणी क्रमांक असलेली ओळखपत्रे फेरीवाल्यांना वाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Mira- Bhayandar : पालिकेत फेरीवाला ओळखपत्र वाटपावरून वाद! खासगी कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस
Published on: 

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या फेरीवाला व्यवस्थापनात अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. फेरीवाला समितीला कोणतीही पूर्वसूचना न देता आणि लेखी आदेश नसताना, बाजार शुल्क वसुलीचे कंत्राट असलेल्या खासगी कंपनीकडून महापालिकेचे नाव, लोगो आणि नोंदणी क्रमांक असलेली ओळखपत्रे फेरीवाल्यांना वाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महापालिकेच्या अधिकृत सर्वेक्षणानुसार शहरातील ८ हजार ५२८ फेरीवाले पात्र ठरले आहेत. नियमानुसार त्यांच्या नियोजनाची आणि ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया महापालिका प्रशासन व शहर फेरीवाला समितीच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. मात्र, बाजार शुल्क वसुलीचे कंत्राट असलेल्या मे. ओडीएस प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडून परस्पर ओळखपत्रे वाटली जात असल्याचे फेरीवाला समितीचे सदस्य ओमप्रकाश गाडोदिया यांच्या निदर्शनास आले.

समिती सदस्यांनी याबाबत प्रशासनाकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराला ओळखपत्र वाटपाचे कोणतेही लेखी आदेश दिले नसल्याचे आणि महापालिकेनेही अशी ओळखपत्रे छापून दिली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी फेरीवाला विभागाच्या सूचनेनुसार बाजार विभागाने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ओळखपत्रांची छपाई, वितरण आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी. तसेच, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फेरीवाला समितीच्या सदस्यांनी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in