सोसायटी-गृहसंकुलात बकरी पालन, कुर्बानीला बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा महासभेत भाजपचा ठराव

मिरा-भाईंदर शहरातील मांसविक्री व्यवसाया सोबतच गृहनिर्माण सोसायट्या व गृहसंकुलांमध्ये बकरीचा सांभाळ आणि कुर्बानी करण्याला बंदी घालण्याचा तसेच सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्रे, मांजर आणि इतर प्राण्यांना खाद्य देण्यावर निर्बंध आणण्याचा धोरणात्मक ठराव सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील मांसविक्री व्यवसाया सोबतच गृहनिर्माण सोसायट्या व गृहसंकुलांमध्ये बकरीचा सांभाळ आणि कुर्बानी करण्याला बंदी घालण्याचा तसेच सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्रे, मांजर आणि इतर प्राण्यांना खाद्य देण्यावर निर्बंध आणण्याचा धोरणात्मक ठराव सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला आहे. मांस विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड तर निर्धारित ठिकाणांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी भटक्या प्राण्यांना खाद्य देणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. वारंवार नियमभंग करणाऱ्या मांस विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याबरोबरच गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

सण-उत्सवांच्या काळात मिरा-भाईंदरमधील सोसायट्यांमध्ये बकरीच्या सांभाळावरून आणि कुर्बानीवरून निर्माण होणारे वाद लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे असा दावा सत्ताधारी भाजपने केला. सोसायटी, गृहसंकुल, घर, दुकान किंवा रस्त्यावर बकरीचा सांभाळ करणे अथवा कुर्बानी करण्याला बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास २५ हजार रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठरावात करण्यात आली आहे. ठराव महापौर डिंपल मेहता यांनी मंजूर केला.

सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना खाद्य देण्यास मनाई

शहरातील रस्ते, चौक, धार्मिक स्थळे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मुलांची खेळण्याची ठिकाणे, पार्किंगची ठिकाणे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्याच्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्रे, मांजर आणि इतर प्राण्यांना उघड्यावर खाद्य देण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या मते, अशा प्रकारे खाद्य दिल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते, नागरिकांना त्रास होतो आणि काही ठिकाणी सामाजिक तेढ तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच प्राण्यांना खाद्य देण्याची परवानगी राहणार आहे. निर्धारित ठिकाणांव्यतिरिक्त अन्य सार्वजनिक ठिकाणी खाद्य दिल्यास ५ हजार रुपयांचा दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दुकानाबाहेर मांस अथवा अवयव लटकवणेही बंद

मांसविक्रीच्या दुकानाच्या दर्शनी भागात किंवा रस्त्यावरून सहज दिसेल अशा ठिकाणी जनावरांचे मांस अथवा अवयव लटकवून ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे आढळल्यास पहिल्यांदा २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तीनपेक्षा अधिक वेळा नियमभंग झाल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे. याशिवाय, मांस बाहेरून सहज दिसू नये यासाठी दुकानांच्या दर्शनी भागात धुरकट काचा बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे.

मांसविक्रेत्यांपासून प्राणीप्रेमींपर्यंत नियमांचा विळखा

मांसविक्री व्यवसायातील अनियमितता रोखणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, या उद्देशाने हा धोरणात्मक ठराव मांडण्यात आला आहे. एकीकडे मांसविक्रेत्यांवर २५ हजार रुपयांचा दंड आणि वारंवार नियमभंग झाल्यास परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी भटक्या प्राण्यांना खाद्य देणाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मिरा-भाईंदरमधील मांसविक्री व्यवसाय, गृहनिर्माण सोसायट्यांमधील बकरी पालन-कुर्बानी आणि भटक्या प्राण्यांना खाद्य देण्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in