

भाईदर : भूगर्भजलाचा बेकायदा उपसा करून ते मिनरल वॉटर म्हणून विक्री करणाऱ्या पाणी माफियांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मीरा-भाईंदर परिसरातील ७१ बेकायदा बोअरवेलधारकांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या असून, पाणी माफियांचे प्लांट आणि अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय महापालिकेतील संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
मीरारोडमधील डाचकुलपाडा येथे रिक्षाचालक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात झालेल्या वादानंतर या भागातील बेकायदा बांधकामे आणि पाणी माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला.
स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता
दरम्यान, अनेक वर्षे भूगर्भजलाची चोरी करून पाणी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदा नफा कमावण्यात आला आहे. शासनाच्या मालकीच्या पाण्याची चोरी, त्याची विक्री आणि अनधिकृत बांधकामांसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. केवळ नोटीस देणे किंवा नाममात्र १० हजारांचा दंड आकारून प्रकरण निकाली काढू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.