

भाईंदर : काशिमीरा पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट कागदपत्रांचा वापर करून मयत व्यक्तीच्या नावाने जमीन विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्रॉपर्टी फसवणुकीतील मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडील धरनीधर खिमचंद शहा (डि. के. शहा) यांनी १९७८ साली मिरे येथील सर्वे नं. ८३ (नवीन सर्वे नं. ०८) मधील एकूण २० एकर ३५ गुंठे जमीन खरेदी केली होती. १९९४ मध्ये त्यांच्या निधनानंतर ही जमीन वारसदारांच्या नावे नोंद झाली होती.
तथापि, प्रॉपर्टी एजंट धर्मेशभाई केशवजी शहा (डि. के. शहा) याने मृत व्यक्तीच्या संक्षिप्त नावाचा दुरुपयोग करून बनावट ऑथोरिटी लेटर व दस्तावेज तयार केले. त्याद्वारे विनुभाई पोपटभाई रवानी आणि अमृतभाई प्रेमजीभाई रामानी यांच्यासोबत बनावट करारनाम्याद्वारे जमीन विक्रीची प्रक्रिया केली.
या प्रकारानंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात २ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. आरोपी पळून गेल्याने पोलिसांनी रणनीती आखून शुक्रवारी पेणकरपाडा, मीरारोड (पूर्व) येथे सापळा रचला आणि धर्मेशभाई केशवजी शहा, विनुभाई पोपटभाई रवानी आणि अमृतभाई प्रेमजीभाई रामानी या तिघांना ताब्यात घेतले.
सद्य गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पानमंद यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे जमीन फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर कसा केला जातो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, पोलिसांनी अशा प्रकरणांवर अधिक कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.