भाईंंदर : मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गिका क्र. ९ शेजारी नवनिर्माणाधीन मेट्रो कामामुळे मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खोदकामामुळे रस्त्यांवर प्रचंड प्रमाणावर खड्डे पडले असून अपघात आणि वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. या समस्येबाबत पालिका व पोलीस प्रशासनाने अनेकदा एमएमआरडीए आयुक्तांना लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या, तरीही रस्त्यावरील खड्ड्यांची स्थिती जशीची तशी राहिली.
या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना न झाल्यामुळे गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टचे विरभद्र कोनापुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी १६ सप्टेंबर रोजी मुख्य न्यायाधीशांच्या समोर होणार आहे.
मीरा-भाईंदर शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दररोज वाहनचालकांचे अपघात होत आहेत. काशिमीरा व हटकेश भागात महिलांनी चालवलेल्या रिक्षांचा टायर खड्ड्यांमध्ये अडकल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनांचे नुकसान झाले आहे.
गोल्डन नेस्ट ते काशीमिरा नाका या मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलावर मास्टिक डांबरीकरण असूनही खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. ठेकेदारांचा दोष दायत्व कालावधी असूनही दरवर्षी खड्ड्यांची मालिका सुरू असल्याने वाहतूककोंडी, इंधनाचा अपव्यय आणि वाहनांच्या खराबीची समस्या निर्माण झाली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने २०२२ साली जे. कुमार ठेकेदाराला खड्डे भरण्याचे काम देऊनही जनतेच्या हितासाठी योग्य उपाययोजना केली नाहीत. पोलिसांवर वाहतूक नियंत्रणासाठी ताण पडल्याने काशिमीरा वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावर खड्डे भरण्यास सुरुवात केली.
मास्टिक पद्धतीने डांबरीकरण न करता चिकट डांबर टाकल्यामुळे दुचाकी अपघाताची शक्यता वाढली आहे. याआधी मेट्रो कामामुळेही अनेक अपघात झाले असून स्थानिक नागरिक, पोलीस अधिकारी, महिला रिक्षा चालक व पत्रकार यांचा समावेश आहे.
जनहित याचिकेत दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यासाठी त्र्यस्थ चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत रस्त्यावरील खड्ड्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्याची आणि एमएमआरडीए व ठेकेदारांवर जबाबदारी लादण्याची मागणी करण्यात आली आहे.
या याचिकेद्वारे मीरा-भाईंदरच्या नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळावी, वाहतूककोंडी आणि अपघात टाळता यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विनानिविदा २२ कोटी खर्च
एमएमआरडीएने तीन वर्षांपूर्वी जे. कुमार ठेकेदाराला २२ कोटी १२ लाख ४९ हजार रुपयांचा विनानिविदा टेंडर देऊन मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र या रस्त्यावर खड्डे पडल्याने कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे पितळ उघडे पडले आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाने अनेक पत्र लिहूनही रस्ता दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्यावर वाहतूक करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.