Mira-Bhayandar : ११७ कंत्राटी संगणक चालकांची उपासमार; तीन महिन्यांपासून वेतन थकीत

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील विविध महत्त्वाच्या विभागांचा कारभार सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ११७ कंत्राटी संगणक चालकांचे मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
Mira-Bhayandar : ११७ कंत्राटी संगणक चालकांची उपासमार; तीन महिन्यांपासून वेतन थकीत
Mira-Bhayandar : ११७ कंत्राटी संगणक चालकांची उपासमार; तीन महिन्यांपासून वेतन थकीत
Published on

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील विविध महत्त्वाच्या विभागांचा कारभार सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ११७ कंत्राटी संगणक चालकांचे मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेतील एसआरए यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसह विविध विभागांमध्ये हे संगणक चालक नियमितपणे काम करत आहेत. मात्र, कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. फेब्रुवारी महिन्याचे वेतन तब्बल मे महिन्यात देण्यात आले होते, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. सध्याच्या ठेकेदाराचे पीएफ खाते डी-ॲक्टिव्हेट असल्याने जुन्या ठेकेदाराकडे जमा असलेली पीएफची शिल्लक रक्कम नव्या खात्यात वर्ग करण्यात अडचणी येत असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

थकीत वेतन आणि पीएफबाबत विचारणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. काही कर्मचाऱ्यांना यापूर्वी तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे हक्काचे वेतन मागावे की रोजगार गमावण्याचा धोका पत्करावा, अशा द्विधा मनःस्थितीत कर्मचारी असल्याचे चित्र आहे.

कारभारावर प्रश्नचिन्ह

या संगणक चालकांचा पुरवठा करण्याचा ठेका ‘ओम साई सिक्युरिटी’ या संस्थेकडे असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेकडून प्रत्येक संगणक चालकासाठी अधिक रक्कम घेतली जात असताना प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना तुलनेने कमी मानधन दिले जात असल्याचा आरोप आहे. तसेच नियमितपणे वेतनपत्रिका (सॅलरी स्लिप) दिली जात नसल्याची तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in