

भाईदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत यंदा भाजपला अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उमेदवारी वाटपात अनेक माजी नगरसेवकांची तिकिटे कापण्यात आल्याने तसेच अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने असंतोष उफाळून आला आहे. परिणामी अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांनी काही बंडखोरांना शांत करण्यात यश मिळवले असले, तरीही अनेक बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात कायम राहिले आहेत. त्यामुळे भाजपच्या विजयाच्या गणितात मोठा बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक रिंगणात प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या माजी नगरसेविका मीना कांगणे, यशवंत कांगणे यांच्यासह अभिषेक भटेवडा व शिखा भटेवडा यांनी अपक्ष म्हणून पॅनल उभे केले आहे. प्रभाग क्रमांक १६ मधून दौलत गजरे, प्रभाग क्रमांक २३ मधून विनोद म्हात्रे, तर प्रभाग क्रमांक १ मधून रीटा शाह, भेरुलाल जैन आणि गौरांग कंसारा यांनी बंडखोरी केली आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधून माजी नगरसेविका रक्षा भूपतानी, प्रभाग क्रमांक ५ मधून माजी नगरसेविका प्रीती पाटील, प्रभाग क्रमांक ४ मधून माजी नगरसेविका प्रभात पाटील यांच्यासह गणेश भोईर व पियुष पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तसेच भाजपसाठी गेल्या ३२ वर्षांपासून निष्ठेने काम करणारे प्रभाग क्रमांक १४ मधील माजी नगरसेवक अनिल भोसले यांच्यासह कविता भोये यांनीही बंडखोरी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक स्पर्धा अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे.
भाजपचा 'अब की बार ७० पार' असा नारा
विशेष म्हणजे अनेक प्रभागांमध्ये हे बंडखोर उमेदवार भाजपच्या पारंपरिक मतपेढीला थेट धक्का देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, भाजपच्या माजी नगरसेविका वीणा भोईर आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सूर्यकांत भोईर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक न लढवता शिवसेना (शिंदे गट) यांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांना बंडखोरांचा मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. भाजपने 'अब की बार ७० पार' असा नारा दिला असला, तरी हा नारा प्रत्यक्षात साकार होणार की केवळ गर्जना ठरणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.