मीरा-भाईंदरच्या परिवहन ताफ्यात ४२ वातानुकूलित ई-बसेस दाखल; RTO नोंदणी प्रक्रिया सुरू; लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार

मीरा-भाईंदर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या परिवहन ताफ्यात ४२ वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत शहरासाठी मंजूर झालेल्या एकूण १०५ ई-बसेसपैकी या बसेस महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.
मीरा-भाईंदरच्या परिवहन ताफ्यात ४२ वातानुकूलित ई-बसेस दाखल; RTO नोंदणी प्रक्रिया सुरू; लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार
मीरा-भाईंदरच्या परिवहन ताफ्यात ४२ वातानुकूलित ई-बसेस दाखल; RTO नोंदणी प्रक्रिया सुरू; लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणारसंग्रहित छायाचित्र
Published on: 

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या परिवहन ताफ्यात ४२ वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत शहरासाठी मंजूर झालेल्या एकूण १०५ ई-बसेसपैकी या बसेस महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. सध्या या बसेसची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राच्या नगरविकास विभागाने देशातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ३८ शहरांना एकूण ३ हजार ३३२ ई-बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १ हजार ३४० बसेस मिळणार आहेत.

या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर शहरासाठी १०० नियमित आणि पाच अतिरिक्त अशा एकूण १०५ ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ६३ मोठ्या बसेस आणि ४२ मिडी बसेसचा समावेश आहे. त्यापैकी सर्व ४२ वातानुकूलित मिडी बसेस महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. आरटीओ नोंदणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बसेस शहरातील विविध मार्गांवर धावणार आहेत.

मीरा-भाईंदरच्या परिवहन सेवेत नव्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार असून, शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित मोठ्या ई-बसेस दाखल झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळ मिळणार आहे.

तिकिटाचे उत्पन्न महापालिकेला मिळणार

या बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. या व्यवस्थेनुसार बसमधून मिळणारे तिकीट उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे, तर बसचे संचालन, चालक आणि तंत्रज्ञांचे वेतन, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असेल. केंद्र सरकारकडून मोठ्या बसेससाठी प्रतिकिलोमीटर २४ रुपये, तर मिडी बसेससाठी २२ रुपये अनुदान दिले जाणार आहे. प्रत्यक्ष संचालन खर्चापेक्षा हे अनुदान कमी असल्याने उर्वरित खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांना ई-बसेस

या योजनेंतर्गत नागपूर आणि ठाणे शहरांना प्रत्येकी १५० बसेस मंजूर झाल्या आहेत, तर कल्याण-डोंबिवली, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, सोलापूर आणि उल्हासनगर या शहरांना प्रत्येकी १०० बसेस मिळणार आहेत. अमरावती आणि लातूरला प्रत्येकी ५०, तर अहिल्यानगरला ४० बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)