Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा

मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन-पाली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा
Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन-पाली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. प्रकल्प तातडीने बंद करणे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करताना, महापालिकेला संबंधित प्राधिकरणाकडून पर्यावरण मंजुरी मिळविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उत्तन-पाली येथे साचलेला तब्बल ९.०९ लाख मेट्रिक टन विना प्रक्रिया केलेला ‘वारसा कचरा’ तीन महिन्यांत हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत कचरा हटविला नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करून ती महापालिकेकडून वसूल करावी, असे निर्देश लवादाने दिले आहेत.

उत्तन-पाली येथील सर्व्हे क्रमांक २५ आणि ६५ येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी २००९ पासून मोठ्या प्रमाणात विना प्रक्रिया केलेला कचरा साचलेला आहे. या प्रकरणातील दहा याचिकाकर्त्या संस्थांच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे ५०० मेट्रिक टन कचरा या ठिकाणी आणला जातो. त्यापैकी सुमारे २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो तेथेच टाकला जात असल्याचा दावा करण्यात आला होता.

वारसा कचरा हटविण्यासाठी कायद्यानुसार निर्धारित कालमर्यादा २०२१ मध्येच संपली असल्याचे लवादाने नमूद केले. त्यामुळे निर्धारित मुदतीत कचरा न हटविल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करावी आणि ती महापालिकेकडून वसूल करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. हरित लवादाचे न्यायिक सदस्य न्या. दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने ७ सप्टेंबर रोजी हा आदेश दिला.

पर्यायी जागेचा प्रश्न कायम

या प्रकरणात महापालिकेने पर्यायी जागांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केल्याची नोंद हरित लवादाने केली आहे. सध्या योग्य पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने नवीन जागा मिळेपर्यंत विद्यमान सुविधा स्थलांतरित करण्याची आवश्यकता नसल्याचे लवादाने यापूर्वीच्या नोंदींच्या आधारे स्पष्ट केले. उत्तन-पाली येथे सुमारे ३१.०२ हेक्टर क्षेत्र घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध आहे. या प्रकल्पात ओला व सुका कचरा प्रक्रिया, लीचेट प्रक्रिया, सॅनिटरी लँडफिल तसेच विकेंद्रित कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कामे सुरू असल्याचे महापालिकेने लवादासमोर सांगितले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in