Mira-Bhayandar : पोलिसांच्या खाकीवर ड्रग्जचा डाग! पोलीस हवालदारासह साथीदाराला अटक; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जनतेचे रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील एका हवालदारालाच अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने मीरा-भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे.
Mira-Bhayandar : पोलिसांच्या खाकीवर ड्रग्जचा डाग! पोलीस हवालदारासह साथीदाराला अटक; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Mira-Bhayandar : पोलिसांच्या खाकीवर ड्रग्जचा डाग! पोलीस हवालदारासह साथीदाराला अटक; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on: 

भाईदर: जनतेचे रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील एका हवालदारालाच अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने मीरा-भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार प्रकाश पवार यांच्यासह त्यांचा कथित साथीदार अखिलेश कुमार याला अमली पदार्थविरोधी कक्षाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ज, रोख रक्कम, दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन पाटील आणि अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांना पोलीस हवालदार प्रकाश पवार हे अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी कक्षाने सापळा रचून कारवाई केली.

भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट

परिसरात, गॅस गोदामाच्या गल्लीत हनुमान मंदिराजवळ पवार यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, असून, जोगेश्वरी येथे राहणाऱ्या अखिलेश कुमार यालाही अटक करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे २७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय एक बर्गमन दुचाकी, पवार यांच्या खिशातील १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमली पदार्थांची विक्री कोणाला केली जात होती, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि या प्रकरणाचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित

प्रकाश पवार हे २०१० पासून पोलीस सेवेत आहेत. त्यांनी यापूर्वी मीरारोड पोलीस ठाण्यात काम केले होते. अलीकडेच त्यांची कनकिया पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. ते सध्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यावरच अमली पदार्थ विक्रीचा आरोप झाल्याने पोलीस दलातील अंतर्गत देखरेख आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना मीरा-भाईंदर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in