भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरात एकाच दिवशी तीन आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाईंदर पूर्व, भाईंदर पश्चिम आणि मीरारोड पूर्व अशा तीन वेगवेगळ्या भागांत या घटना घडल्या.
पहिली घटना भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट परिसरात घडली. जितेशकुमार परिहार (२९) यांनी मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद नवघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दुसरी घटना भाईंदर पश्चिम येथील गणेश देवल नगर, जनता नगर रोड येथे घडली. विकासकुमार बिंद (२१) या रिक्षाचालकाने घरात कोणी नसताना छताच्या लोखंडी आडव्या बारला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याची आई व भाऊ मंगळवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तर, तिसरी घटना मीरारोड पूर्व येथील काशिगाव परिसरात घडली.
दीपक शर्मा (२१) यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवण्यात आली आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) केली असून पुढील तपास सुरू आहे.