भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरात अनधिकृत रिक्षांच्या वाढत्या तक्रारींमुळे व रिक्षांशी संबंधित दोन धार्मिक वाद घडल्यामुळे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी ही बाब गंभीरतेने घेतली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश शिवरकर यांनी अनधिकृत रिक्षांवर कठोर कारवाई करण्याचे पत्रक जारी केले आहे. तसेच, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.
शहरात हजार ते बाराशे अनधिकृत रिक्षा चालत असल्याचे पोलिसांनी मान्य केले असून, वाहतूक पोलिसांच्या निष्क्रिय कारभारावर वचक आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत. गेल्या दोन महिन्यात शहरात दोन धर्मातील वाद घडल्याची नोंद असून, त्या दोन्ही वादात रिक्षा समान माध्यम ठरली आहे.
विशेषतः काशिगांव, मीरारोड, भाईंदर व काशिमीरा परिसरात परप्रांतिय युवक रिक्षा चालवून आपली उपजिविका करत आहेत. वाहतूक पोलिसांच्या डम्पिंग गोदामात २४३ अवैध रिक्षा जप्त असून, स्थानिकांच्या माहितीनुसार हजार ते बाराशे रिक्षा अवैधपणे आयुक्तालयात चालत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे आदेशात नमूद आहे.
पोलीस आयुक्तांनी अवैध रिक्षा कारवाई मोहीम परिणामकारक राबविण्यास वारंवार सूचना दिल्या असून, काशिमीरा वाहतूक विभागाने त्या सूचना दुर्लक्ष केल्यामुळे आयुक्तांनी गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष पोलीस अंमलदारांकरवी दिवस-रात्र विशेष ऑपरेशन आयोजित करून किमान २० ते २५ अनधिकृत रिक्षा जप्त कराव्यात.
दिवस-रात्र मोहीम
आईसीजीसी पोर्टलचा वापर करून २४३ अवैध रिक्षांचे तसेच सध्या वापरात असलेल्या अवैध रिक्षांवर जप्तीची कारवाई करावी आणि मूळ मालक शोधावे. बँक कर्ज असल्यास रिक्षा बँकांना परत कराव्यात. दि. ११ ते दि. ३१ डिसेंबरपर्यंत अवैध रिक्षांवर कार्यवाही करण्यासाठी दिवस-रात्र मोहीम राबवावी. केलेल्या कारवाईचा अहवाल थेट पोलीस आयुक्त व सहायक आयुक्तांना शनिवारी सादर करावा.
गोडावून येथे कर्तव्यास असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जमा असलेल्या रिक्षाबाबत योग्य ती कागदपत्रांची पडताळणी करावी, तडजोड फी भरल्याची खात्री करावी आणि मूळ मालकांना वाहन ताब्यात द्यावे. वाहनांची कागदपत्रे झेरॉक्स प्रती घेऊन वेळोवेळी सादर करावेत.
सतीश शिवरकर, सहाय्यक आयुक्त