

धीरज परब / भाईंदर
मीरा भाईंदर शहरात पाणी कपात १० टक्के असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मात्र प्रत्यक्षात १५ टक्के पेक्षा जास्त पाणी कपात करत असल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईची धग नाहक जास्त सहन करावी लागत आहे.
मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून रोजचे ८६ तर एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. मात्र एमआयडीसीने १२५ दशलक्ष लिटर पाणी २०३१ पर्यंत द्यायचे आहे. सध्या एमआयडीसी ११८ दशलक्ष लिटर इतके पाणी देते तर स्टेम प्राधिकरण ८३ ते ८४ दशलक्ष लिटर पाणी शहराला रोज पुरवते, असा महापालिकेचा दावा आहे.
मीरा भाईंदर हे पाणी पुरवठ्याच्या धरणांपासून शेवटच्या टोकाला असल्याने पाणी कमी व कमी दाबाने मिळते. त्यामुळे एखाद दिवस शट डाऊन झाला तरी पाणी पुरवठा सुरळीत होण्यास ३ ते ४ दिवस जातात.
स्टेममार्फत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत अशा १८ तासाकरिता तसेच एमआयडीसीकडून आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी रात्री १२ पासून ते शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत एकुण ३६ तासाकरीता मिरा-भाईंदर शहरास होणारा पाणी पुरवठा बंद केला जात आहे.
एमआयडीसीकडून रोज मिळणाऱ्या सुमारे ११८ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी गेल्या शुक्रवारी केवळ १२ दशलक्ष लिटर आणि शनिवारी केवळ २७ दशलक्ष लिटर पाणी आले. स्टेम प्राधिकरण कडून ८३ ते ८४ दशलक्ष लिटर ऐवजी बुधवारी ३५ दशलक्ष लिटर पाणी आले.
एमआयडीसीच्या पाणी कपातीचा गेल्या १९ ते २५ ऑक्टोबर या आठवड्याभराचा हिशोब केला तर ६३१ दशलक्ष लिटर पाणी आले आहे. वास्तविक गेल्या आठवड्यात सरासरी ११८ दशलक्ष लिटर रोज पाणी धरले तर आठवड्याचे ८२६ दशलक्ष लिटर पाणी होते. त्याच्या १० टक्के कपात नुसार ८३ दशलक्ष लिटर पाणी वजा केले तर ७४३ दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात मात्र एमआयडिसीने ११२ दशलक्ष लिटर पाणी कमी दिल्याने केवळ ६३१ दशलक्ष लिटर पाणीच शहराला मिळाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एमआयडीसी कडून १० टक्के नव्हे तर १५ टक्के पेक्षा जास्त पाणी कपात केली जात आहे.
एमआयडीसी आठवड्याभरात सुमारे ८३ दशलक्ष लिटर पाणी १० टक्के प्रमाणे कमी देणे अपेक्षित आहे तसेच वेळच्या बाबतीत देखील एमआयडीसी जास्तकाळ पाणी पुरवठा खंडित करत आहे. आठवड्याभराचे तास नुसार १० टक्के कपातीचे धरले तरी सुमारे १८ तास पाणी पुरवठा खंडित राहिला पाहिजे. मात्र एमआयडीसी सलग ३६ तास पाणी बंद करत आहे.
पाणी पुरवठ्याच्या दरात वाढ
एमआयडीसी पाणी आणि वेळेच्या बाबतीत १० टक्क्यांपेक्षा जास्त कपात करत असल्याने नागरिकांना जास्त पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा ७० ते ७५ तासांवर गेला. जेणे करून पाण्यासाठी अनेक भागात हाहाकार माजला असून दुसरीकडे खासगी टँकर लॉबीने पाणी पुरवठ्याचे दर हजार ते २ हजारांनी वाढवले आहेत.