

मीरारोड पूर्वेतील घोडबंदर परिसरात भरधाव आणि नियमभंग करणाऱ्या अवजड वाहनांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी रात्री घराबाहेर दुचाकीवरून निघालेल्या १७ वर्षीय अंश सुजित बागल या तरुणाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या काँक्रीट मिक्सरने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश बागल हा मीरारोड पूर्वेतील 'अपना घर' या गृहसंकुलात राहत होता. रविवारी रात्री तो दुचाकीवरून बाहेर पडत असताना संकुलाबाहेरील रस्त्यावर वळण घेत असतानाच समोरून 'राँग साइड' ने येणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सरने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, दुचाकी वाहनाखाली चिरडली गेली, तर अंश काही अंतरावर फेकला गेला. डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच काशिगाव पोलीस ठाणे येथील पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आरएमसी टँकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक तपासात चालकाने निष्काळजीपणे व विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जे.पी. इन्फ्रा मार्ग व 'अपना घर' परिसरात अवजड वाहने सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याची तक्रार त्यांनी केली. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.