भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मीरारोड येथे भाजपच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांना भेटवस्तू वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसने याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मीरारोडमधील जे. पी. इन्फ्रा संकुलात मीरा-भाईंदर शहर जिल्हा प्रभाग १३ च्या वतीने महिला संमेलन व हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील बॅनरवर भाजप पक्षाचे नाव, चिन्ह आणि राजकारणी नेत्यांचा फोटो टाकलेला होता. या वेळी महिलांना हळदीकुंकूसह विविध भेटवस्तू दिल्या गेल्या. प्रभागातील भाजपचे माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार संजय थेराडे, भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार प्रीती जैन तसेच भाजप कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची छायाचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत.
आचारसंहितेच्या काळात सणांच्या नावाखाली आयोजित कार्यक्रमात निमंत्रणपत्रिका, बॅनरवर पक्षाचे चिन्ह किंवा राजकीय फोटो असू नयेत. कोणत्याही राजकीय नेत्याचा वा उमेदवाराचा सत्कार आयोजित करणे, कोणत्याही वस्तूंचे वाटप करणे निषिद्ध आहे. तसेच सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊन कार्यक्रम करणे देखील आचारसंहिता भंग ठरते. तरीही या कार्यक्रमादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाले आणि पोलीस, महापालिका व आचारसंहिता पथके यांच्याकडून कानाडोळा सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पोलिसांनी सखोल चौकशी करणे आवश्यक
मतदारांना भ्रष्ट मार्गाने मतदानासाठी आमिष दाखवले गेले असल्यामुळे प्रभाग १३ मधील काँग्रेसचे इच्छुक आणि युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र खरात यांनी भाजपचे संजय थेराडे, प्रीती जैन यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन छायाचित्रातील सर्व भेटवस्तू जप्त करणे, उपस्थितांची पोलिसांनी सखोल चौकशी करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक अधिनियम व मनी लाँड्रिंग कायद्यांनुसार आवश्यक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भाईंदर पूर्वेतील श्री सिद्धिविनायक सेवक चॅरिटेबल ट्रस्टच्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या आड राजकीय भेटवस्तू वाटप आणि नियमबाह्य प्रकारांबाबत सव्वाशेपेक्षा जास्त नागरिकांनी तक्रार नोंदवली आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पालिकेच्या प्रभाग समिती ४ चे स्वप्नील सावंत यांना पत्र पाठवून चौकशी करून आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यामुळे आचारसंहिता पथकांची भूमिका प्रश्नांखाली आली आहे; पोलीस, महापालिका आणि पथके या उघडपणे सुरू असलेल्या प्रकारांना थांबवण्यात निष्क्रिय राहिल्याचा आरोप समोर आला आहे.
ॲड. कृष्णा गुप्ता, अध्यक्ष सत्यकाम फाऊंडेशन