

भाईदर : मीरारोड येथील नया नगर परिसरातील एका चौकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महापालिका महासभेत जोरदार वादंग निर्माण झाला. संबंधित चौकाला पूर्वी देण्यात आलेले टिपू सुलतान यांचे नाव काढून टाकत भाजपने अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव मांडला, जो अखेर मंजूर करण्यात आला.
या ठरावावरून भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. भाजपकडून चर्चेदरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच महात्मा गांधी यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया देत "एपस्टिन फाइल, ट्रेड डील व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलायचे का?" असा पलटवार करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, २०१६ साली भाजपचेच तत्कालीन नगरसेवक नरेंद्र मेहता व वर्षा भानुशाली यांनी ठराव करून या चौकाला टिपू सुलतान यांचे नाव दिले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपनेच ते नाव बदलण्याचा प्रस्ताव महासभेत आणल्याने वातावरण तापले.
विकास आघाडीचे गटनेते जय ठाकूर यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांनीही टिपू सुलतान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी देखील नामांतराच्या निर्णयामागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, भाजपा गटनेते हसमुख गेहलोत यांनी काँग्रेसवर टीका करत ऐतिहासिक संदर्भ दिले. यानंतर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये परस्पर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेरीस, संबंधित चौकाचे नाव बदलून अशफाकउल्ला खान चौक असे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.