

धीरज परब / भाईंंदर
१९८९ साली रीतसर नोंदणीकृत कराराने जमीन खरेदी केल्यावर २००७ साली सातबारा नोंदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र असगर अली वोरा यांचे नाव लागले होते. मात्र वारस तपासाचा विषय असताना त्यावेळी वोरा यांचे नाव कमी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याच जमिनीची परस्पर खरेदी-विक्री आणि कब्जा तसेच तक्रारी करून देखील न्याय मिळत नाही म्हणून वोरा यांनी आपल्या बालपणीचे मित्र पंतप्रधान मोदी यांनाच गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष भेटून आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर कारवाईची विनंती केली होती. त्यानंतर चक्रे वेगाने फिरून प्रशासन-शासन धावते झाले. तब्बल १९ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर संपूर्ण जमिनीच्या सातबारा नोंदीत आता वोरा यांचे नाव लागले आहे. शुक्रवारी महसूल विभागाने फेरफार मंजुरीसह सातबारावर वोरा यांची भोगवटादार म्हणून नोंद केली आहे.
मीरारोडच्या इंद्रलोक फेज ६ भागात मौजे नवघर येथील सर्वे क्रमांक १८५/६ हि २८१० चौमी जागा असगर अली वोरा आणि दाऊद वोरा यांनी १९८९ सलात नोंदणीकृत कराराने खरेदी केली होती. २००७ सालात सातबारावर दोघांची नावे फेरफारने नोंदवलेली होती. मात्र नोव्हेम्बर २००७ मध्ये पॉल अंतोनि फर्नाडिस यांच्या वारसांच्या चौकशीचे आदेश झाले असताना वारस तपास ऐवजी वोरा यांची ७१२ वर केलेली नोंदच रद्द केली गेली. वास्तविक १९८९ च्या खरेदी करारनाम्यात जागा विक्री करणाऱ्यांत पॉल यांची देखील सहमती व स्वाक्षरी असताना एकदा विक्री केलेल्या जमिनीच्या हिस्सेदाराच्या वारस तपास करण्याचा प्रकार आश्चर्य चकित करणारा होता.
वोरा यांच्या जागेच्या सातबारावर नवी एंट्री
पॉल आणी रोझ फर्नांडिस यांच्या हिश्श्याची जागा १९८९ सालीच नोंदणीकृत कराराने वोरा यांना विक्री झालेली असताना २०१४ मध्ये मेरवीन जोसेफ फर्नांडिस ह्या मुंबईच्या खारदांडा येथिल व्यक्तीची एंट्री झाली. त्यांनी पॉल हे आपले वडील जोसेफ यांचे भाऊ होते आणि पॉल व रोझ यांच्या मृत्यू नंतर आपणच एकमेव वारस असल्याचे न्यायालयात सांगत वारस हक्क प्रमाणपत्र मिळवले. न्यायालयाने प्रमाणपत्र व दावा मंजूर केल्याने मेरवीन यांचे नाव एकूण जागेच्या ५० टक्के क्षेत्रावर सातबारावर नोंद झाले.
दोनवेळा बांधकाम परवानगी रद्द
मार्विन सह मुकेश पारेख आणि संदीप पराडकर यांच्या सहमती द्वारे ती जागा २०१९ साली भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीने खरेदी केली होती. पालिकेने दोन वेळा बांधकाम परवानगी दिली. मात्र वोरा यांच्या तक्रारी नंतर दोन्ही वेळा बांधकाम परवानगी रद्द केली गेली.
संगनमताने कुलमुखत्यार पत्रात खाडाखोड
दुसरीकडे स्वयं बिल्डरचे भागीदार लालजीभाई गोविंदभाई सोळंकी यांनी २०११ साली नोंदणी कराराने सदर जमिनीचा ५० टक्के हिस्सा खरेदी केला. वोरा यांनी तक्रार केल्यावर मूळ जमीन मालक लोबो कुटुंबीयांनी देखील वोरा यांच्या बाजूने साक्ष देत स्वयं बिल्डरच्या करारात दाखवण्यात आलेले कुलमुखत्यारपत्र हे लोबो कुटुंबाच्या १८६/१३ ह्या दुसऱ्या जागेसाठीचे असल्याचे समोर आले. स्वयं बिल्डर व अन्य यांनी संगनमताने कारस्थान करून कुलमुखत्यार पत्रात खाडाखोड करत हिस्सा क्रमांक १३ ऐवजी ६ लिहीला आणि क्षेत्र मध्ये खाडाखोड केलेल्या बनावट कागदपत्र आधारे खरेदी व्यवहार केल्याने स्वतः शासना कडूनच २०१५ साली स्वयं बिल्डर व अन्य यांच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन केली तक्रार
जमिनीच्या एका भागात ७११ कंपनी तर दुसऱ्या भागात स्वयं डेव्हपलरने ताबा ठेवला. रीतसर जमीन खरेदी करून देखील प्रशासकीय, न्यायालय आणि राजकारणी अश्या तिन्ही स्तरावर वोरा यांचा लढा हक्कासाठी सुरु झाला. परंतु न्याय मिळत नसल्याने अखेर सप्टेंबर महिन्यात मुंबईत आलेले बालमित्र पंतप्रधान मोदी यांची वोरा यांनी भेट घेऊन अन्यायाचा पाढा वाचत सीबीआय चौकशीची विनंती केली. बालमित्राने पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आ. मेहता यांनी जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करत असल्याचे व बांधकाम परवानगी रद्द करण्याबाबत जाहीर करून तसे पत्र कंपनीला दिले. पालिकेने बांधकाम परवानगी सह दिलेला टीडीआर रद्द केला. मात्र जमिनीचा ताबा वोरा यांना मिळाला नाही.
महिनाभरात तब्बल १० वेळा सुनावणी
मुख्यमंत्री कार्यालयात तक्रारी झाल्या असल्याने तिकडून देखील निर्देश दिले गेले. दरम्यान मेरवीन यांनी पॉल हे सख्खे काका नसून आपल्या सावत्र आजीचा मुलगा असल्याचे पोलिसात कबूल केले. आपल्याला या जमिनीची माहिती नव्हती सर्व काही पराडकर आणि नंतर पारेख आदींनी केल्याचे सांगितले. तर महसूल विभागाने वोरा यांचे नाव सातबारावर नोंदवण्यासाठी कार्यवाही सुरु केली. तलाठी नवघर यांनी सातबारावर वोरा यांचे नाव नोंदवण्याची व हरकती मागवण्याची प्रक्रिया केली. त्यावर स्वयं बिल्डर आणि मुकेश पारेख यांच्या कडून हरकती देऊन वोरा यांचे नाव नोंदवण्यास विरोध केला गेला. या प्रकरणी अपर तहसीलदार यांच्या कडे १३ ऑक्टोबर ते १९ नोव्हेम्बर ह्या काळात तब्बल १० वेळा सुनावणीच्या तारखा झाल्या.
पहिला नोंदणीकृत खरेदी करारनामा ग्राह्य
अप्पर तहसीलदार यांनी २५ नोव्हेंबर रोजी आदेश पारित करत पारेख व स्वयं बिल्डर यांच्या हरकती नामंजूर केल्या. २७ पानांच्या आपल्या आदेशात अपर तहसीलदार यांनी, पहिला नोंदणीकृत खरेदी करारनामा १९८९ सालचा वोरा यांच्या नावे असल्याने भारतीय नोंदणी कायद्यानुसार त्याला विधिग्राह्य ठरवले. १९८९ सालचा नोंदणीकृत दस्त हा वोरा यांच्या नावे कायम असून तो कुठल्याही न्यायालयाने रद्द केलेला नाही. वोरा यांच्या अर्जानुसार त्यांचे नाव सातबारावर नोंदवण्याचा फेरफार २७ नोव्हेंबर रोजी मंजूर केला.