
मुंबई: दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे २५ लाख रुपयांच्या ४३४ ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अब्दुल हलीम खान या कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. नवरत्न मोहनलाल मेहता हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा झव्हेरी बाजार येथे सुंदर ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. परिसरातील कारागिराकडून ते सोन्याचे दागिने बनवून या दागिन्यांची होलसेलमध्ये विक्री करतात. काळबादेवी येथील फोपळवाडी परिसरात अब्दुल खान याचा एआरके गोल्ड नावाचा एक कारखाना असून तो सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. गेल्या पाच वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित असून नवरत्न मेहता हे अनेकदा अब्दुलकडून सोन्याचे दागिने बनवून घेतात. जानेवारी महिन्यांत त्यांनी त्याला २५ लाख रुपयांचे ४३४ ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. पंधरा दिवसांत दागिने बनवून देतो असे सांगून त्याने दिलेल्या मुदतीत दागिने बनवून दिले नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे ते त्याच्या कारखान्यात गेले आणि त्याच्याकडे सोन्याची मागणी केली. यावेळी त्याने सोने देतो असे सांगून त्यांना काही दिवसांनी बोलाविले. मात्र सोने न देता त्याचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अब्दुल हलीम खानविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.